हवामानातील सततच्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मान्सूनबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यास थोडा विलंब होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये प्रवेश करतो. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे, असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे.
गेल्या वर्षी २९ मे रोजी दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता, तर २०२१ मध्ये ३ जून रोजी आणि २०२० मध्ये १ जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचला होता. नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये वाहण्यास सुरुवात झाली असून, उष्ण आणि कोरड्या ऋतूचा पावसाळा ऋतूत बदल होण्याचे महत्त्वाचे सूचक आहे. एल निनोची भीती असतानाही नैऋत्य मोसमी हंगामात भारतात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. पावसावर आधारित शेती हा भारताच्या कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. ५२ टक्के शेती क्षेत्र या सिंचन पद्धतीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण अन्न उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के त्यांचा वाटा असून, ते भारताच्या अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
हेही वाचाः भारताच्या ‘या’ डावपेचाने चीन गारद; आयातीत २३ टक्क्यांहून अधिक घट
केरळनंतर मान्सून इतर भागात सक्रिय होणार
मान्सूनचे सक्रिय असणे हे भारतासाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये दिरंगाई झाल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याचा विशेषत: शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यांच्या पेरणी आणि मशागतीवर परिणाम होतो. मान्सून केरळपासून सुरू होतो आणि उर्वरित देशात सक्रिय होतो. अशा स्थितीत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्यास उशीर झाला, तर देशातील उर्वरित भागातील स्थितीही बिघडते.
हेही वाचाः मोठी बातमी! मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आणखी अनेक बँका विकण्याच्या तयारीत
यंदा एल निनोचा प्रभाव
यावेळी सर्व यंत्रणांनी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तज्ज्ञांनी एल निनो प्रभावाचा अंदाज देखील व्यक्त केला आहे, त्यामुळे तीव्र उष्णतेसह वादळ आणि पुराचा धोका आहे. गेल्या वेळी २०१६ मध्ये विक्रमी उष्णतेची लाट आली होती. यावेळीही तो विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सध्या तापमान ४० अंशांच्या वर जात असून, दिवसेंदिवस ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.