पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या तिसऱया आघाडीवर ताशेरे ओढत निवडणुकांना उद्देशून तयार झालेली तिसरी आघाडी ही अव्यवहार्य थकलेली आघाडी असल्याचे म्हटले आहे.
तसेच आगामी निवडणुकांनंतर सध्याच्या कोणत्याही आघाडींपेक्षा वेगळ्याप्रकारची संघीय आघाडी देश चालवेल असे भाकितही केले. त्याचबरोबर निवडणुकानंतर संधी मिळाली की पंतप्रधान होण्याच्या इच्छेवर त्यांनी स्पष्टपणे होकार दिलेला नसला तरी, माझ्याबाबत जनतेला निर्णय घेऊ दे असे म्हणून स्वत:साठीचे पंतप्रधानपदाचे दार उघडे ठेवले. तसेच आगामी निवडणुकांत तृणमुल काँग्रेसला पश्चिम बंगालमधील जनता उंदड प्रतिसाद देईल असा विश्वासही बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केला.
आघाडीकडे कोणतेही बलस्थान असो, कम्युनिस्टपणा जरी असला तरी याआधी कम्युनिस्ट पक्षाला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे ही तिसरी आघाडी नसून थकलेली आघाडी असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
विविध ११ पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या तिसऱया आघाडीकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? या प्रश्नावर बोलत असताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अशी आघाडी आधीच करून चालत नाही. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच आघाडीचे करण्याबाबतचे महत्व लक्षात येते आणि येत्या निवडणुकांनंतर देशात सांघिक आघाडीचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.