भारतीय जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल देण्यात येणारे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जाहीर करण्यात आले. शांतताकाळातील जवानांच्या अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात येणारे कीर्तिचक्र तिघाजणांना तर, १० जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दाखविलेले शौर्य, माओवाद्यांविरोधात आखलेल्या मोहिमेतील पराक्रम आणि उत्तराखंड राज्यातील महाजलप्रलयानंतर केलेले अद्वितीय बचावकार्य यासाठी तिघा जणांना कीर्तिचक्र बहाल करण्यात येणार आहे.
५/५ गोरखा रायफल्सचे नायब सुभेदार भूपालसिंग छांतेल मगर यांनी ३१ ऑगस्ट, २०१३ रोजी कुपवारा जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक ६ घुसखोरांना पाहिले. अत्यंत सावधपणे हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना त्यांनी दोघा अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. या पराक्रमाबद्दल त्यांना कीर्तिचक्र जाहीर झाले आहे.
उत्तराखंड राज्यातील महाजलप्रलयात बचावकार्य करणाऱ्या भारतीय वायुदलाच्या विंग कमांडर डॅरेल कॅस्टेलिनो यांनाही हा सन्मान देण्यात येणार आहे. २३ जून रोजी बचावकार्य करणारे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लष्कराचे जवान आणि प्रवासी यांचे प्राण वाचविण्यासाठी कॅस्टेलिनो यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
केंद्रीय राखील पोलीस दलाच्या २०५ कोब्रा बटालियनचे हवालदार भृगूनंदन चौधरी यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. बिहारमधील नक्षलग्रस्त भागात गस्त घालीत असताना आपल्या सहकाऱ्यांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा नक्षलींचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला होता, या प्रयत्नातच त्यांना वीरमरण आले होते. त्यांनाही कीर्तिचक्राने गौरविण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2014 रोजी प्रकाशित
अतुलनीय शौर्य दाखविणाऱ्या तिघा जवानांना कीर्तिचक्र
भारतीय जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल देण्यात येणारे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जाहीर करण्यात आले. शांतताकाळातील जवानांच्या
First published on: 26-01-2014 at 04:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three armed forces personnel get kirti chakra