प्रयागराज : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून आतापर्यंत लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती भारतीय व्यापारी उद्योग महासंघाने दिली. हा आजवरचा विक्रम असल्याचा दावाही महासंघाने केला आहे.

महाकुंभामुळे धार्मिक पर्यटनाबरोबर रोजगारवृद्धीसाठी झाली आहे. या निमित्ताने श्रद्धा आणि आर्थिक विकास याचा उत्तम संगम झाल्याचे महासंघाचे सरचिटणीस व खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी नमूद केले. सुरुवातीला ४० कोटी भाविक व दोन लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज होता. मात्र आता भाविकांचा आकडा साठ कोटींवर गेला असून आर्थिक व्यवहारही तीन लाख कोटींवर जाण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केवळ प्रयागराजच नव्हे तर वाराणसी आणि अयोध्येलाही भाविक भेट देत आहेत. त्यामुळे त्या शहरांतील हॉटेलसह संबंधित सेवा क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. उत्तर प्रदेशात इतरत्रही वैद्याकीय सेवा तसेच तंत्रज्ञान क्षेत्रालाही महाकुंभचा लाभ झाल्याचे खंडेलवाल म्हणाले. महाकुंभाचा कार्यकाळ वाढविण्याची मागणी करण्यात आली असली तरी नियोजित वेळेतच सोहळा संपुष्टात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

साडेसात हजार कोटींची गुंतवणूक

महाकुंभ निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुमारे साडेसात हजार कोटींची गुंतवणूक केली. रस्ते, उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांची उभारणी करण्यात आली. दीड हजार कोटींची रक्कम पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर खर्च करण्यात आली आहे.

सामान्यांची पायपीट

सरकारने वाहनांची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली असली तरी सामान्य भाविकांना संगमापर्यंत जाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. दररोज भाविकांची संख्या काही लाखांत असल्याने संगमापर्यंत चालत जाण्याखेरीज गत्यंतर नाही. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे कुंभामध्ये हरविणाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. ठिकठिकाणी मदत केंद्रे आहेत. निरक्षर असलेल्या व्यक्तीच हरविल्याच्या अधिक घटना असल्याचे समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकात्मिक नियंत्रण कक्ष

सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून देखरेख ठेवली जात आहे. साडेचार हेक्टरच्या हरिसरावर २७०० कॅमेऱ्यांची नजर असल्याचे कक्षाचे प्रमुख व भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले. काही संशयास्पद आढळल्यास त्वरेने दखल घेतली जाते. याखेरीज वाहतूक कोंडी किंवा एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास ती पांगवण्यासाठी तातडीने सूचना दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.