Tirupati Temple Laddus Case : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराचे कामकाज पाहाणारे तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) हे मंदिरात लाडू प्रसादम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपातील भेसळीमुळे सध्या चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) हाती घेतला आहे. सीबीआयच्या तपासात या संपूर्ण भेसळीच्या प्रकाराबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या तपासानुसार देवस्थानाला लोणी पुरवठा करणाऱ्या कंपनीने गेल्या ५ वर्षा कुठूनही दूध किंवा तूप खरेदी केलेले नव्हते. तरीही, त्यांनी मंदिराला तब्बल ६८ लाख किलो तुपाचा पुरवठा केला, ज्याची किंमत २५० कोटी रुपये होती.
ही माहिती समोर आल्यानंतर अजय कुमार सुगंध या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यानेच उत्तराखंड येथील भोले बाबा ऑर्गेनिक डेअरीला विविध रसायने, जसे की मोनोडिग्लिसराइड्स आणि ॲसिटिक अॅसिड इस्टरचा पुरवठा केला. त्याला टीटीडीकडून तूप पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. हे तूप लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरले जात होते, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
टीटीडीला ५ वर्ष कसं फसवलं?
२०१९ पासून ते २०२४ पर्यंत डेअरी प्रमोटर्स पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी कथितपणे बनावट तूप मंदिराला पुरवले. त्यांनी सुरुवातीला तूप तयार करण्याचे खोटे युनीट उभारले, बनावट दूध खरेदी दाखवली आणि पेंमेंट रेकॉर्ड्स तयार केले. नेल्लोर न्यायालयात एसआयटीने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये यासंबंधीचा सर्व तपशील देण्यात आला आहे.
सीबीआयने सांगितले की, भोले बाबा डेअरीला २०२२ मध्ये अपात्र ठरवून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. तरीही, त्यांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने टीटीडीला भेसळ केलेल्या तुपाचा पुरवठा करणे सुरूच ठेवले. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी तिरूपती येथील वैष्णवी डेअर, उत्तर प्रदेशातील माल गंगा आणि तामिळनाडू येथील एआर डेअरी फूड्स अशा इतर डेअरीच्या माध्यमातून कंत्राट मिळवण्यासाठी निविदा दाखल केल्या.
सीबीआयला असेही आढळून आले की, गेल्या वर्षी जुलैमध्ये एआर डेअरीने पाठललेल्या आणि प्राण्यांच्या चरबीची भेसळ केलेले तुपाचे चार कंटेनर टीटीडीने नाकारले होते. मात्र, याच तुपाचा साठा भोले बाबा डेअरीच्या प्रमोटर्सनी वैष्णवी डेअरीच्या माध्यमातून टीटीडीला पुन्हा पाठवून दिला.
FSSAI अधिकारी आणि एसआयटीने एआर डेअरीच्या दिंदीगुल येथील प्लांटची पाहणी केली आणि त्याना चार तुपाचे टँकर आढळले जे एआर डेअरी प्लांटकडे कधीच परत आले नाहीत, तर ते वैष्णवी डेअरी प्लांटच्या जवळ असलेल्या स्थानिक खडी केंद्राकडे वळवण्यात आले.
एका महिन्यानंतर ऑगस्टमध्ये वैष्णवी डेअरी जी अजूनही टीटीडीसाठी आंध्र प्रदेश सर्कल कॅटेगरीसाठी पुरवठा करत होती तिने ट्रकवरील लेबल बदलले, गुणवत्ता सुधारणेचा बनावट डेटा तयार केला आणि तोच नाकारलेल्या तुपाचा साठा तिरूपती ट्रस्टला केला, असे सीबीआयने म्हटले आहे.
आणि हेच निकृष्ट दर्जाचे तूप तिरूपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरले गेले.
