नक्षलीविरोधातील मोहिमेदरम्यान घडवण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे जवानांच्या वाहनांना होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) अशा वाहनांच्या वापरावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी दलाच्या कमांडरना नक्षलग्रस्त भागांत टेहळणीसाठी अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा पुरवण्यात येणार आहे.  नक्षली भागांत नेहमीच्या टेहळणीवर असणाऱ्या जवानांना भुसुरुंग स्फोटातही अपघातग्रस्त न होणारी वाहने देण्यात येतात. परंतु या वाहनांच्या वापरावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ आपत्कालीन परिस्थितीत अथवा कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अशी वाहने वापरण्यात येतील, असे सीआरपीएफचे प्रमुख दिलीप त्रिवेदी यांनी सांगितले.
नक्षलींकडून घडवून आणण्यात येणाऱ्या घातक कारवायांपासून जवानांचा बचाव व्हावा, या उद्देशासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती कमांडरच्या मार्फत मिळाल्याचे सीआरपीएफचे महासंचालकांनी सांगितले.
नक्षलीविरोधातील मोहिमेत सीआरपीएफ जवानांची महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी देशातील अत्यंत कडव्या नक्षली भागांत ९० हजार अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. यासाठी शंभरहून अधिक भुसुरुंगविरोधी वाहने देण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीतच शस्त्रांनी सज्ज अशा वाहनांचा वापर करण्यात येतो, परंतु नेहमीच्या टेहळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांनाच नक्षलींनी शक्तिशाली स्फोटांत लक्ष्य केले आहे. यात सुमारे ७० टक्क्यांहून अधिक हल्ले सुरक्षा जवानांच्या वाहनांवर झाले आहेत.