करोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या देशातील कोविड योद्ध्यांप्रती येत्या ३ मे रोजी तिन्ही सैन्य दलांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात  येणार आहे. या योद्ध्यांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचा समावेश होतो. इंडियन एअर फोर्सकडून फ्लाय पास्ट तर समुद्रात उभ्या असलेल्या भारतीय नौदलांच्या जहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लॉकडाउनचा कालावधी आणखी दोन आठवडयासाठी वाढवण्यात येत असल्याचे जाहीर होण्याआधी ही घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला सीडीएस बीपिन रावत यांच्यासोबत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही उपस्थित होते. “प्रत्येक करोना वॉरिअर आणि आमच्या देशातील सर्व नागरिकांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. ३ मे रोजी तिन्ही सैन्यदलांकडून विशेष कवायती सादर केल्या जातील” अशी माहिती सीडीएस रावत यांनी दिली.

‘जेव्हा देशाचा विषय असतो तेव्हा आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. हे आपल्या देशात प्रत्येकाला समजते’ असे रावत म्हणाले. कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्स काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरात कच्छपर्यंत फ्लाय पास्ट करणार आहे. हेलिकॉप्टरमधून रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे आणि वैद्यकीय इमारतींबाहेर लष्कराचा विशेष बॅण्ड वाजवला जाईल.