चीनचे पंतप्रधान ली केकियांग रविवारपासून भारतभेटीवर येत आहेत. आपल्या भेटीत केकियांग सीमेवर चीनकडून अलीकडेच करण्यात आलेल्या घुसखोरीबाबत चर्चा करतील, अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धिंगत करण्यासंदर्भातही ते चर्चा करतील, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
सीमावादावर तोडगा काढण्यासाठी ली केकियांग कदाचित भारतभेटीवर येणार नाहीत. मात्र या प्रश्नावर तोडागा काढण्यासाठी आणि परस्परसंबंध सुधारण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. चीनने आतापर्यंत १३ देशांशी असलेल्या सीमावादावर तोडगा काढला आहे. केवळ भारताशी सीमावादावर तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे ब्रिटिशांनी सोडून दिलेल्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांना पुढे यावे लागेल, असे व्हिक्टर गाओ झिकाई या विचारवंतांनी म्हटले आहे.
ली केकियांग यांच्यासमवेत उद्योगपतींचे मोठे शिष्टमंडळही दौऱ्यावर येणार असून दिल्ली आणि मुंबईला ते भेटी देणार आहेत.