पाकिस्तानसह काश्मीर, अफगाणिस्तान व ताझिकिस्तान या पट्टय़ात अनेक ठिकाणी शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची सर्वाधिक तीव्रता पाकिस्तानमध्ये होती.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह अनेक भागांमध्ये शुक्रवारी भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी असल्याचे पाकिस्तानच्या हवामान खात्याने सांगितले. या भूकंपात कोणतीही हानी झाली नाही. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान आणि ताझिकिस्तान यांच्या सीमेवर होते.
पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुन्वा प्रांतातील पेशावर, मलकंद, मनसेहरा, हरिपूर, स्वात, दीर व अबोटाबाद या ठिकाणीही भूकंपाचे हादरे जाणवले. भयभीत झालेले लोक रस्त्यांवर येऊन प्रार्थना करत होते. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी होती आणि त्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील जार्म येथे होते, असे अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.
काश्मीर खोऱ्यालाही शुक्रवारी ५.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. सुमारे १५ सेकंद आलेल्या या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात होते, असे हवामान खात्याने सांगितले. काश्मीर हे अत्याधिक भूकंपप्रवण क्षेत्रात वसलेले आहे. भूकंपाच्या हादऱ्याने घाबरलेले नागरिक सुरक्षतेसाठी घरातून बाहेर पडून रस्त्यावर उतरले. भूकंपामुळे कुठेही हानी झाल्याचे वृत्त नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.