एखाद्या गोष्टीच्या लालसेपोटी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. चीनमधील जियांग्सु प्रांतात काही दिवसांपूर्वी याचे प्रत्यंतर आले. येथील दोघाजणांनी बाजारपेठेत नव्याने आलेला ‘आयफोन-६ एस’ खरेदी करण्यासाठी चक्क स्वत:च्या किडन्या विकायचा प्रयत्न केला. मात्र, यापैकी वु नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांकडून वेळीच अटक करण्यात आली. आमच्याकडे ‘आयफोन-६ एस’ खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. परंतु, काही केल्या आम्हाला तो हवाच होता. तेव्हा माझा मित्र हुआंग याने आपण स्वत:ची एक किडनी विकून आयफोन विकत घेऊ शकतो, असा पर्याय सुचविल्याचे वु याने सांगितले. त्यानंतर या दोघांनी इंटरनेटवरील एका अनधिकृत दलालामार्फत त्यासाठीचे प्रयत्नही सुरू केले. त्या दलालाने वु आणि हुआंग यांना किडनी विकण्यापूर्वी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले होते. मात्र, रूग्णालयात आल्यानंतर वु चे मन अचानक पालटले आणि त्याने स्वत:ची किडनी न विकण्याचा निर्णय घेतला. त्याने हुआंगालाही ही गोष्ट समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वुचा सल्ला ऐकला नाही. दरम्यान, या घटनेनंतर वु ने लगेच पोलिसांशी संपर्क साधून याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे सध्या पोलीस बेपत्ता हुआंगाच शोध घेत असल्याचे चायना डेली या वृत्तपत्राकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Sep 2015 रोजी प्रकाशित
‘आयफोन-६ एस’ विकत घेण्यासाठी किडनी विकण्याचा प्रयत्न
एखाद्या गोष्टीच्या लालसेपोटी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही.
Written by रोहित धामणस्कर

First published on: 16-09-2015 at 01:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two chinese men try to sell kidney for latest iphone 6s