पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद; आज पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरजवळ केलेल्या या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी सडेतोड उत्तर दिले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा एकदा मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरजवळ केलेल्या या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

पाकिस्तानकडून छोटी शस्त्रे, अॅटोमॅटिक उखळी तोफांचाही हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने टार्गेट केले होते. मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

दोन्ही बाजूने झालेल्या या गोळीबारात विनोद सिंह आणि जाकी शर्मा हे दोन भारतीय जवान गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनोद सिंह जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील खेती दानापूर येथील रहिवासी होते. तर रायफलमॅन असलेले जाकी शर्मा हे जम्मूच्या संहैल गावचे रहिवासी होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two jawans have lost their lives in ceasefire violation by pakistan army in sunderbani sector along the line of control