गेल्या वर्षी टॅक्सीमध्ये एका २५ वर्षांच्या अधिकारी महिलेवर बलात्कार करून तिचा जीवही धोक्यात आणल्याच्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उबर कंपनीच्या टॅक्सी चालकास दोषी ठरवले आहे. त्याला आजन्म कारावासाची कमाल शिक्षा होऊ शकते. ही महिला गुरगाव येथील एका कंपनीत आर्थिक विभागात अधिकारी असून ५ डिसेंबर २०१४ रोजी तिच्यावर टॅक्सीने घरी परत जात असताना या चालकाने बलात्कार केला होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बवेजा यांनी सर्व गुन्हय़ांमध्ये शिवकुमार यादव (वय ३२) या टॅक्सीचालकास दोषी ठरवले असून त्याच्यावर महिलेवर बलात्कार करून तिचा जीव धोक्यात आणणे, अपहरण करणे, विवाहाची जबरदस्ती करणे, धमकावणे असे आरोप ठेवले होते व भादंवि कलमानुसार लावलेले हे सर्व आरोप शाबित झाले आहेत. शिवकुमार यादव याला सर्व त्याच्यावर ठेवलेल्या सर्व आरोपात दोषी ठरवण्यात येत आहे. त्याच्या शिक्षेबाबत २३ ऑक्टोबरला युक्तिवाद होतील, असे न्यायाधीशांनी सांगितले. अवघ्या अकरा महिन्यांत त्यांनी निकाल देऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. रेडिओ टॅक्सीजच्या सुरक्षिततेबाबत यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यादव याला आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. तो न्यायालयीन कोठडीत असून आज त्याची पत्नी, आईवडील व इतर कुटुंबीयांसह न्यायालयात हजर होता. न्यायालयाने ७ ऑक्टोबरला याबाबत निकाल राखून ठेवला होता.

फिर्यादी पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले, की गेल्यावर्षी ५ डिसेंबरला ही गुरगावच्या कंपनीत काम करणारी ही अधिकारी महिला इंद्रलोक येथील तिच्या घरी परत जात असताना उबर कंपनीच्या टॅक्सीत या चालकाने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपीला ७ डिसेंबर २०१४ रोजी मथुरेतून अटक करण्यात आली होती. फिर्यादी पक्षाने एकूण २८ साक्षीदार सादर केले. यादव याने सर्व आरोप नाकारले व ते चुकीचे असल्याचे सांगितले.