बलात्कारप्रकरणी उबेरचा चालक शिवकुमार यादवला जन्मठेप

टॅक्सीतच एका २७ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला उबेरचा टॅक्सी चालक

उबेरचा चालक शिवकुमार यादव.

टॅक्सीतच एका २७ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला उबेरचा टॅक्सी चालक शिवकुमार यादव याला मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी याप्रकरणी निकाल देताना शिवकुमार यादव याला बलात्कार आणि शाररिक हानी पोहोचविल्याप्रकरणी निर्धारित कलमांनुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याला अपहरण करणे, धमकावणे याअंतर्गत देखील दोषी ठरविण्यात आले.

यंदाच्या जानेवारी महिन्यात दिल्ली न्यायालयात शिवकुमार यादवविरुद्ध कलम ३६६ आणि ३२३ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान शिवकुमार यादवने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता.

डिसेंबर २०१४ मध्ये पीडित युवतीने हॉटेलमधून घरी जाण्यासाठी मोबाईल ऍपवरून उबेरकडून टॅक्सी मागविली होती. शिवकुमार यादव या टॅक्सीचा चालक होता. टॅक्सीने घरी जात असताना सदर तरूणीला ग्लानी आली, मात्र भानावर येताच टॅक्सी एका निर्जन स्थळी असल्याचे तिला आढळले. तिने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवकुमारने तिला धमकी दिली आणि त्यानंतर टॅक्सीतच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर यादवने सदर युवतीला तिच्या घरी सोडले आणि झाल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uber rape case convict shiv kumar yadav sentenced to life imprisonment