किरीट सोमय्यांचे नाव अद्याप लोकसभेसाठी जाहीर झालेले नाही. त्यामुळे ते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आता किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र त्यांना ही भेट मिळालेली नाही. कारण सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांबद्दल प्रचंड नाराजी आहे. पहिल्या दोन टप्प्प्यातील निवडणुकांसाठीचे उमेदवारांचे अर्ज भरून झाले आहेत. मात्र शिवसेना-भाजपाच्या ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही.

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. किरीट सोमय्यांच्याऐवजी मनोज कोटक यांचा विचार व्हावा असाही सल्ला काही शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांचा पत्ता कट होण्याची चिन्हं आहेत. किरीट सोमय्यांनी अनेकदा शिवसेनेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न सुरु केली आहेत. मात्र मातोश्रीवरून त्यांना भेट नाकारण्यात आली आहे.

किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संजय राऊत यांनीही त्यांना भेट नाकारली आहे. किरीट सोमय्यांना जेव्हा यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर जाण्यास सांगितले.