एपी, ब्रसेल्स : रशियाच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी लढाऊ विमाने द्यावीत, अशी मागणी युक्रेनने पुन्हा केली आहे. परंतु अमेरिका आणि ‘नाटो’च्या सदस्य राष्ट्रांच्या मते युक्रेनला मोठय़ा प्रमाणात दारूगोळय़ाची गरज आहे. रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष होणार असून या दीर्घ संघर्षांत युक्रेनला दारुगोळा कमी पडेल, अशी चिंता या राष्ट्रांना वाटत आहे.

‘नाटो’च्या मुख्यालयात युक्रेन संपर्क गटाच्या बैठकीपूर्वी, युक्रेनने आपली गरज स्पष्ट केली. युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांना युक्रेनला आता कोणती लष्करी मदत हवी आहे, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी लढाऊ विमानाची प्रतिमा त्यांना दाखवली. ‘ते कोठून येतील, अशी आशा त्यांना वाटते?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर रेझनिकोव्ह यांनी फक्त ‘आकाशातून’ असे त्रोटक उत्तर दिले.

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी गेल्या आठवडय़ात लंडन (ब्रिटन), पॅरिस (फ्रान्स) व ब्रसेल्सचा (बेल्जियम) दुसरा परदेश दौरा केला. त्यावेळी झेलेन्स्कींनी या देशांकडे लढाऊ विमाने देण्याची आग्रही मागणी केली. युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी रणगाडे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर युक्रेनकडून ही मागणी करण्यात आली आहे.

आपला दारुगोळय़ाचा साठा कमी न करता युक्रेनला दारूगोळय़ाचा सातत्याने पुरवठा कसा चालू ठेवायचा, यावर ‘नाटो’ संघटनेच्या सदस्य राष्ट्रांचा भर आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की सध्या तरी कोणत्याही मोठय़ा हल्ल्यासाठी रशियन लष्कराकडे अपुरी साधने आहेत. सध्या रशियन सैन्याला बहुसंख्य क्षेत्रांत कूच करण्याचे आदेश दिले जातात. परंतु निर्णायक यशासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधनसामग्री, रसदही नाही.

  जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी सांगितले, की युक्रेनसाठी लढाऊ विमानांपेक्षा दारुगोळा व हवाई हल्ल्यांपासून संरक्षण सध्या अधिक महत्त्वाचे आहे. वैमानिकांना नवीन विमान प्रशिक्षणास अनेक महिने लागतात. युक्रेनच्या सहकारी राष्ट्रांनी युक्रेनची सर्वाधिक गरज कोणती आहे यावर लक्ष केंद्रित करावे. जर्मनीने युक्रेनला पुरविलेल्या स्वयंचलित, विमानविरोधी तोफांसाठी दारूगोळा निर्मिती करार केला आहे. कारण युक्रेनला दारूगोळा अपुरा पडल्याने तो आणण्यासाठी इतरत्र धावाधाव करावी लागली होती.

नव्याने हल्ल्यांची शक्यता  

युक्रेन अंदाजे दररोज सहा ते सात हजार तोफगोळय़ांचा मारा करत आहे. हे प्रमाण रशिया वापरत असलेल्या दारुगोळय़ांच्या सुमारे एक तृतीयांश आहे. रशियन लष्कराने युक्रेनच्या पूर्वे भागावर आक्रमण करून युक्रेनला पिछाडीवर टाकले आहे. तसेच युक्रेनच्या दक्षिणेकडे त्यांची संरक्षण फळी मजबूत केली आहे. हिवाळय़ात हा संघर्ष बंद होता. मात्र आता प्रतिकूल हवामान सुधारल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोमाने आक्रमण सुरू होण्याची अपेक्षा आहे.