सीरियाचे अध्यक्ष बशार असद यांच्या राजवटीत संहारक शस्त्रास्त्रांचा वाढता वापर होत असल्याबद्दल त्यांचा निषेध करण्याच्या अरबपुरस्कृत ठरावास संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मंजुरी दिली आहे. सीरियात राजकीय स्थित्यंतर घडवून आणण्याचाही मुद्दा ठरावामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा ठराव सीरियास बांधील नाही.  दरम्यान या ठरावासंबंधी भारताने तटस्थता दर्शविली तर पाकिस्तानने आपल्या मागच्या भूमिकेत आश्चर्यकारक बदल करून या ठरावाच्या बाजूने मतदान केले.
सदर ठरावाच्या बाजूने १०७ तर विरोधात १२ मते पडली. ५९ देशांनी या ठरावासंबंधी तटस्थता दर्शविली. सीरियाचा अत्यंत निकटचा समजल्या जाणाऱ्या रशियाने नकारात्मक मतदान केले तर अर्जेन्टिनाच्या नेतृत्वाखालील लॅटिन अमेरिकी राष्ट्रांनी या ठरावात काही बदल करण्याच्या केलेल्या सूचना अमान्य करण्यात आल्या.
भारत तटस्थ
सीरियात राजकीय स्थित्यंतर घडवून आणण्याच्या अरब राष्ट्रांच्या ठरावावर भारताने तटस्थ भूमिका घेतली. या ठरावावर अन्य ५८ देशांनी भारताच्या भूमिकेची री ओढली तर रशियासह अन्य १२ राष्ट्रांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत अशोककुमार मुखर्जी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. अशा प्रकारे एकतर्फी कारवाई करून पेचप्रसंग संपुष्टात येणार नाही, उलट त्याची तीव्रता वाढेल आणि अस्थैर्यही वाढीस लागून सीरियाच्या सीमेबाहेरही हिंसाचार वाढू शकेल. सीरियाचे नेतृत्व कोणी करायचे याचा निर्णय सीरियन नागरिकांवरच सोपवावा, आमसभेने करू नये, असे सांगून तसे केल्यास एक धोकादायक पायंडा पडेल आणि ते आपल्याला परवडणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.