गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी  हैदराबादमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या बहुचर्चित मेळाव्याला संबोधित करणार असून या मेळाव्यावर आंध्र प्रदेशच्या विभाजनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची गडद सावली पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसने स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीची घोषणा ३० जुलै रोजी केल्यानंतर तटवर्ती आंध्र आणि रायलसीमामध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीने रायलसीमातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना तेथून किमान १० हजार लोक मोदींच्या मेळाव्यासाठी उपस्थित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तथापि, भाजपने तेलंगणाबाबत जी भूमिका घेतली आहे त्याविरुद्ध कडाप्पा, कुर्नूल, अनंतपूर आणि चित्तूर जिल्ह्यांतील नेते आणि कार्यकर्त्यांचे मत असल्याने त्यांनी मोदी यांच्या मेळाव्यापासून दूर राहण्याचे ठरविले आहे, असे कळते.
मोदी यांचा मेळावा भाजपसाठी प्रतिष्ठेचा असला तरी त्याला रायलसीमामधून केवळ ४००-५०० जण उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मोदी हे भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख असतानाही त्यांच्या सभेला हजर राहण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते रायलसीमातील नेते आणि कार्यकर्त्यांचे मन वळवू शकलेले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.