केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा;  मोदी सरकारला शंभर दिवस पूर्ण

सध्या जाणवत असलेले आर्थिक संकट तात्पुरते आहे. आर्थिक तेजी-मंदीचे चक्र नेहमीच सुरू असते. जागतिक मंदीचा भारतावर थोडा फार परिणाम झालेला आहे इतकेच; पण हातपाय गळून जाण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली नाही. देशाची आर्थिक मूलतत्त्वे भक्कम आहेत. त्यामुळे खूप चिंतित होण्याची गरज नाही, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केला.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कालखंडाला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मोदी सरकारच्या धोरणात्मक यशाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. कमी वेळेत झटपट निर्णय आणि तितक्याच तातडीने अंमलबजावणी कशी करतात हे मोदी सरकारने शंभर दिवसांमध्ये दाखवून दिले असल्याचे जावडेकर म्हणाले. काश्मीरपासून जनधन, जलशक्ती ते उज्ज्वला योजनेपर्यंत तमाम निर्णयांची यादी जावडेकर यांनी वाचून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दूरदृष्टी असून इस्रोच्या प्रमुखांचे अश्रू पुसणारे मोदी हे सहृदयी आणि संवेदनशील असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.

अनुच्छेद ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकबंदी, अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती, ५ हजार कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय अशा सगळ्याच महत्त्वाच्या धोरणांची आखणी मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वीच केलेली होती. पुन्हा सत्तेवर आल्यावर ती लगेचच लागू झाली. कितीही नियोजन केले तरी त्यानुसार तंतोतंत पावले टाकता येत नाहीत. आता आर्थिक विकासाची गती कमी झाली असली तरी गेली पाच वर्षे सात टक्के दराने विकास झाला. काँग्रेसच्या यूपीए सरकारच्या काळातदेखील विकास दर पाच टक्क्य़ांवर घसरलेला होता, असा युक्तिवाद करत जावडेकर यांनी आर्थिक धोरणावरून संकटात सापडलेल्या मोदी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

‘काँग्रेसची दखलच नको!’

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप केला आहे. त्यावर जावडेकर म्हणाले की, शंभर दिवसांपैकी ९० दिवस काँग्रेस नेते कुठे हे त्यांनाच माहिती नाही. त्यांच्या टिपणीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. मोदी सरकारने काम केले की नाही हे जगाने पाहिले आहे. लाल किल्ल्यावरून दिलेले तसेच राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील मोदींचे भाषण, अधिवेशनात संमत झालेली तीसहून अधिक विधेयके हे पाहता इतक्या प्रचंड गतीने काम करत असलेले सरकार काँग्रेसने कधी पाहिलेलेच नाही, असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले.

‘काश्मीरमध्ये शांतता’

काश्मीरमध्ये गेल्या पस्तीस दिवसांमध्ये एकदाही गोळीबार झालेला नाही. तिथे शांतता असून विदेशी प्रसारमाध्यमांनी हिंसक घटनांची दिलेली वृत्ते दिशाभूल करणारी आहेत. ती चार वर्षांपूर्वीची असून सत्य जाणून घ्यायचे तर सरकारी दूरदर्शनची वाहिनी पाहायला हवी. जम्मू-काश्मीरमध्ये फक्त १४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केलेली आहे. अन्यत्र कुठेही लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर नियंत्रण आणलेले नाही, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.

सुडाचे राजकारण -काँग्रेस

नवी दिल्ली : उन्मत्तपणा, अनिश्चितता, सुडाचे राजकारण ही मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कारभाराची वैशिष्टय़े आहेत, अशी टीका काँग्रेसने केली असून काश्मीरमधील स्थिती, आर्थिक दुरवस्था, आसाममधील एनआरसी, विरोधी नेत्यांवरील सुडाची कारवाई या मुद्दय़ांवर सरकारला धारेवर धरले आहे. भाजपला जनतेने बहुमत दिले, जनतेला दिलासा अपेक्षित होता, पण उलटेच घडत आहे.  प्रश्न वाढत आहेत. सरकारची पाळीव माध्यमे आता अधिकच पक्षपाती झाली आहेत, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला.  राजकीय विरोधकांवर सुडाने कारवाई केली जात आहे. सक्तवसुली संचालनालय व प्राप्तिकर विभाग तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग यांचा गैरवापर केला जात आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.