पेडन्यूजबाबत अयोग्य माहिती दिल्यामुळे निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर टीका केली आहे.
निवडणुकीच्या खर्चाबाबत असत्य माहिती सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर निवडणूक आयोग कारणे दाखवा नोटीस बजावितो ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय सिंग यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नोटिशीमुळे भाजप २००८ मध्ये कशा प्रकारे सत्तेवर आला ते सिद्ध होते. निवडणुकीतील गैरव्यवहार उघडकीस झाला हे भाजपचे केवळ एकमेव प्रकरण नाही. धार मतदारसंघातील भाजपच्या आमदार नीना वर्मा यांची निवडणूक गेल्या ऑक्टोबर महिन्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली होती, असेही अजयसिंग यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेश मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, संसदीय कामकाजमंत्री असलेल्या मिश्रा यांना अपात्र ठरविण्याबाबत आयोगाने नोटीस बजावली आहे. मिश्रा यांच्याकडून निवडणूक खर्चाबाबतचे स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.