उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दोन लहान मुलांनी मदत केल्याची माहिती उघड झाली आहे. हे दोन्ही विद्यार्थी दहावी इयत्तेत शिकत असून ते रस्ता चुकल्यामुळे नियंत्रण रेषा पार करून भारताच्या हद्दीत आल्याचा दावा त्यांचे कुटुंबिय आणि शाळेच्या मुख्याधापकांनी केला आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दोघांनीही उरी येथील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना मदत केल्याची कबुली दिली आहे. यापैकी फैसल हुसेन अवान हा पाकिस्तानच्या कुमी कोटे तर त्याचा मित्र एहसान खुर्शिद हा मुझफ्फराबाद येथे राहणारे आहेत. उरी हल्ल्यानंतर २१ सप्टेंबरला या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते. फैसल आणि एहसान राहत असलेली गावे नियंत्रण रेषेपासून चालत गेल्यास तासभराच्या अंतरावर आहेत.
दरम्यान, फैसल अवानचा भाऊ गुलाम तब्बसुम याने उरी हल्ल्याच्यावेळी म्हणजे १७ सप्टेंबरला आपला भाऊ घरीच असल्याचा दावा केला आहे. गुलाम हा पेशाने डॉक्टर आहे. उरी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडे सापडलेल्या जीपीएस यंत्रांनुसार दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून आल्याचे स्पष्ट झाले होते. आम्हाला या माध्यमातून कोणताही वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळेच मी आतापर्यंत मीडियाकडे गेलो नव्हतो. मात्र, एक मोठा भाऊ म्हणून फैसलचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे. सध्या मला काय करावे हे समजेनानसे झाले आहे. भारतामधील कोणत्यातरी शक्तिशाली व्यक्तीला ही गोष्ट समजावी आणि त्यांनी दोन्ही मुलांना परत घरी पाठवावे, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे गुलाम तब्बसुम याने म्हटले. तर दुसरीकडे फैसल शिकत असलेल्या मुझफ्फराबादमधील शाळेचे मुख्याधापक बशरत हुसैन यांनीदेखील फैसल एक चांगला , हुशार आणि मनमिळाऊ विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. तो दररोज सहा तास शाळेत असायचा, असे हुसैन यांनी सांगितले. दरम्यान, शाळेच्या नोंदीप्रमाणे फैसल व एहसान या दोघांचेही वय १६ इतके आहे. त्यामुळे भारतातील ज्युवेनाईल कायद्याप्रमाणे त्यांना विशेष संरक्षण मिळू शकते. दरम्यान, याविषयी भारतीय लष्कराला विचारण्यात आले असता त्यांनी हे दोन्ही विद्यार्थी जैश-ए- मोहम्मदसाठी काम करत असल्याचे म्हटले. घटनास्थळी करण्यात आलेल्या चौकशीच्या आधारावर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्यांना अटक करताना त्यांच्या वयाची खातरजमा करण्यात आली होती का, याविषयीचे उत्तर अद्याप लष्कराने दिलेले नाही. भारतीय लष्कराने ही माहिती आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिली आहे. आम्ही या पुराव्यांचा अभ्यास करून अंतिम अहवाल सादर करू, अशी प्रतिक्रिया एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार अशाप्रकारे रस्ता चुकून नियंत्रण रेषा ओलांडण्याचे प्रकार कधीकधी घडतात. गेल्या पाच वर्षात अशाप्रकारची डझनभर प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, एनआयएच्या माहितीनुसार या दोन्ही मुलांनी अनेकदा आपला जबाब बदलला आहे. यापैकी एकाने तर आपण प्रत्यक्ष सहभागी झाल्याचाही दावा केला आहे. उरीच्या तळावर असलेल्या तंबुंना कशाप्रकारे आग लावण्यात आली, याची तपशीलवार माहिती या मुलाने दिली आहे. तर फैसलने उरी हल्ल्यात कंठस्नान घालण्यात आलेल्या एका दहशतवाद्याला ओळखल्याचेही एनआयएने म्हटले आहे.