उत्तर कोरियाने गेल्या महिन्यांत आण्विक चाचणी केल्याने त्यांच्यावरील र्निबध अधिक तीव्र करण्याबाबतचा संयुक्त ठराव अमेरिका आणि चीनने बुधवारी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत केला. उत्तर कोरियातील बँकिंग सेवा आणि त्यांचे मुत्सद्दी यांना यासाठी लक्ष्य करण्यात आले आहे.
सदर संयुक्त ठरावातील र्निबधांमुळे उत्तर कोरियाकडे बेकायदेशीर अणुचाचणी आणि अण्वस्त्र कार्यक्रम विकसित करण्याच्या असलेल्या क्षमतेला आळा बसेल, असे संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूत सुझान राइस यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाने पुन्हा अणुचाचणी केल्यास त्यांना या प्रक्षोभक कृत्याची किंमत मोजावी लागणार असल्याचे संकेत या ठरावातून देण्यात आले असल्याचे राइस यांचे म्हणणे आहे. या ठरावामुळे उत्तर कोरियावर लादलेले र्निबध संयुक्त राष्ट्र संघाला पुढील कारवाईसाठी उपयुक्त ठरणार असून त्यांच्यावर नवी कायदेशीर बंधने घालता येणे शक्य होणार आहे.
उत्तर कोरियातील राजनैतिक अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कारवाया, त्यांची बँकिंग सेवा, मोठय़ा प्रमाणावर रोख रकमेचे हस्तांतरण आणि नव्या पर्यटन मर्यादा यांना प्रथमच लक्ष्य करण्यात आले आहे. यापूर्वीही तीनदा त्यांच्यावर र्निबध लादण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिक कडक र्निबधांना तोंड द्यावे लागणार आहे.
या र्निबधामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची अणुमुक्तीशी असलेल्या बांधीलकीची व्याप्ती दिसणार आहे. त्यामुळे उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय बंधनांचे पालन करावे, अशी मागणी राइस यांनी केली आहे.