One Big Beautiful Bill : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाची जगभरात चर्चा असते. टॅरिफ धोरण आणि अमेरिकेत बेकादेशीरपणे राहणाऱ्यांना हद्दपार करण्यासह अनेक मोठे निर्णय ट्रम्प प्रशासनाने आतापर्यंत घेतले आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी असलेल्या ‘वन बिग ब्युटीफुल बिला’ची मोठी चर्चा सुरू होती.
या विधेयकावरून डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यामध्ये मदभेद देखील झाले होते आणि त्यानंतर त्यांच्यात वादही रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता हेच ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर झालं आहे. या बिलाचं ‘वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट’ असं नाव असून हे विधेयक सिनेटमध्ये ५१-५० च्या फरकाने मंजूर करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
खरं तर आज दिवसभर या ‘वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट’वर अमेरिकन सिनेटमध्ये चर्चा सुरू होती. तसेच यावर मतदान देखील घेण्यात आलं. यानंतर हे विधेयक अखेर ५१-५० च्या फरकाने मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक प्रतिनिधी सभागृहात जाणार असून तिथे देखील येत्या काही दिवसांत त्यावर मतदान होण्याची शक्यता आहे.
‘वन बिग ब्युटीफुल बिल’ म्हणजे काय?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला दिलेल्या काही प्रमुख आश्वासनांच्या आधारे दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यातील काही आश्वासने, जसं की विविध देशांमधून आयातीवर शुल्क लादणे, कार्यकारी आदेशांद्वारे अंमलात आणता येतात. परंतु काही आश्वासने अशी आहेत, ज्यांची पूर्तता करण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे, जो अमेरिकन काँग्रेसचा (प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट यांचा समावेश) विशेष अधिकार आहे.
अशा परिस्थितीत ट्रम्प यांना त्यांच्या सर्व निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही गोष्टींसाठी काँग्रेसची मान्यता घ्यावी लागेल. हे लक्षात घेता, ट्रम्प यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बदलांचा समावेश करून ‘बिग ब्युटीफुल बिल’ तयार केलं आहे. या विधेयकात ट्रम्प यांनी त्यांचा धोरणात्मक अजेंडा आणि प्रचारातील आश्वासने एकत्रितपणे समाविष्ट केली आहेत.