संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला शनिवारी सुरूवात झाली. उत्तर प्रदेश लोकसभेवर सर्वाधिक खासदार पाठविणारे राज्य असल्यामुळे या निवडणुकांकडे २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. उत्तर प्रदेशात ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर ११ मार्चला मतमोजणी पार पडेल. दरम्यान, आजच्या पहिल्या टप्प्यात राज्याच्या पश्चिम भागातील ७३ मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यावेळी तब्बल २.६ कोटी मतदार आपला कौल मतपेटीत टाकतील. २०१३ मध्ये हिंसाचारात ६५ लोकांचा झालेला मृत्यू आणि हिंदूधर्मीयांना निर्वासित करण्यात आल्याच्या आरोपांमुळे या भागातील अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळेय याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात याठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अशा सर्व बड्या नेत्यांनी याठिकाणी सभा घेतल्या आहेत. गेल्या अडीच वर्षातील केंद्र सरकारचा कारभार , नोटाबंदी , जातीय हिंसाचार, भाजप नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्ये या पार्श्वभूमीवर याठिकाणचे मतदार काय कौल देणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. या भागातील मतदानाचा पॅटर्न उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतो.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात रंगलेल्या गृहकलहाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे भाजप या निवडणुकांमध्ये सरशी साधणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, नंतरच्या काळात अखिलेश यांनी निवडणूक आयोगातील लढाई जिंकत प्रचारामध्ये जोशात पुनरागमन केले होते. याशिवाय, निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे सपा आणि काँग्रेस यांच्यात झालेली युती. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांपैकी २९८ जागी समाजवादी पक्ष, तर उर्वरित १०५ जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे.