उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी सूचक वक्तव्य केले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार उत्तर प्रदेशला यावे. त्यामुळे आमची मैत्रीच होईल. राहुल गांधी अत्यंत चांगला माणूस आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अखिलेश यादव यांना राहुल गांधी यांच्या किसान यात्रेबद्दल प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, राहुल गांधी खूप चांगला माणूस आहे. त्यांनी वारंवार उत्तर प्रदेशला आले पाहिज आणि इथे राहिले पाहिजे. ते इथे जास्त राहिले तर आमची त्यांच्याशी मैत्री होईल. आमच्यात मैत्री झाली तर कोणालाच अडचण असण्याचे कारण नाही. दोन चांगली माणसे एकत्र येत असतील, तर कोणाला अडचण असण्याचे काहीच कारण नाही.
अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यावरून पुढील काळात दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊ शकते का, असा प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देताना ते म्हणाले, जर दोन चांगली माणसे एकमेकांच्या जवळ येत असतील, तर त्यामध्ये राजकारण कशाला शोधत बसता.
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधून किसान यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेमध्ये ते २५०० किलोमीटरचा प्रवास करणार असून, विविध ठिकाणी खाट सभा घेणार आहेत. काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांच्या संकल्पनेतून किसान यात्रेचे आणि खाट सभांचे आयोजन करण्यात आले आहे.