अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते. उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वच स्तरांतून दु:ख व्यक्त होत आहे.

गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून १९६२ साली मुक्तता झाली. त्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष सतरा वर्षे सत्तेत होता. उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते.

आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात अच्युत उसगावकर यांनी भरपूर लोकोपयोगी कामे केली. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते.