“बंधू आणि भगिनींनो बंगाल फुटबॉलवर प्रेम करणारं राज्य आहे. त्यामुळेच मी फुटबॉलच्या भाषेत सांगू इच्छतो, तृणमूल काँग्रेसने एका पाठोपाठ एक असे कित्येक ‘फाउल’ केलेले आहेत. गैरप्रशासन, विरोधकांवर हल्ला व हिंसाचाराचा फाउल, बंगालच्या लोकांचा पैसा लुटण्याचा फाउल व श्रद्धेवर होत असलेल्या हल्ल्यांचा फाउल. बंगालची जनता सर्वकाही पाहत आहे. त्यामुळे आता लवकरच बंगाल तृणमूलला राम कार्ड दाखवणार आहे.” असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार)पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलताना केलं.

पंतप्रधान मोदी आज आसाम व पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी हल्दिया येथील एका सभेत बोलताना सर्वप्रथम उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयाबाबतची माहिती लोकांना दिली व मी सातत्याने तिथल्या परिस्थितीची माहिती घेत असल्याचे सांगितले. उत्तराखंडसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यानंतर तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, “पश्चिम बंगालची आज जी परिस्थिती आहे, त्याचं सर्वात मोठं कारण येथील राजकारण आहे. इथं विकासाचं राजकारण झालं नाही. पहिले काँग्रेसने राज्यं केलं तर मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार समोर आला. डाव्यांच्या शासनकाळात भ्रष्टाचार व अत्याचार दिसून आला आणि विकास ठप्प झाला. त्यानंतर ममता यांनी परिवर्तनाचं वचन दिलं, लोकांनी विश्वास ठेवला. मात्र दहा वर्षांच्या शासनकाळात हे स्पष्ट झाले की हे परिवर्तन नव्हतं तर डाव्यांचे पुनर्जीवन आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधली गरीबीचे प्रमाण वाढत गेलं, उद्योगधंदे बंद होत गेले.”

तसेच, “बंगालमध्ये आपली लढाई टीएमसी बरोबर आहे. मात्र आपल्याला त्यांच्या छुप्या मित्रांपासून देखील सावध रहावं लागणार आहे. डावे, काँग्रेस आणि टीएमसी हे पडद्यामागे मॅच फिक्सिंग करण्यात गुंतले आहेत. दिल्लीत भेटून ते राजकारणावर चर्चा करतात. केरळमध्ये काँग्रेस व डाव्यांनी मिळून पाच वर्ष राज्याला लुटण्याचा करार केला आहे.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी टीएमसी बरोबरच काँग्रेस व डाव्या पक्षांवर देखील यावेळी निशाणा साधला.