आपल्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. एका व्यक्तीला करोना झाला ती व्यक्ती बरी झाली तर त्या व्यक्तीला पुन्हा करोना होण्याची भीती असते का? यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी उत्तर दिलं आहे. एकदा करोना होऊन गेल्यानंतर त्याचा संसर्ग पुन्हा होण्याची चिन्हं फारच कमी आहेत. कारण करोना झाल्यानंतर जे इलाज केले जातात त्यामुळे शरीरात काही अँटीबॉडीज तयार करतात. ज्यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढते. अशा रुग्णाला पुन्हा करोना होण्याची शक्यता फारच कमी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

असं असलं तरीही जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे बरे झालेत त्यांनीही आणि ज्यांना करोना झालेला नाही त्यांनीही काळजी घ्यावी असंही गुलेरिया यांनी सुचवलं आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अशात जुलै, ऑगस्ट महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे. याबाबत एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा करोना होऊ शकतो का? हा मुख्य प्रश्न होता. याला त्यांनी उत्तर दिलं आहे. असं होण्याची शक्यता जवळ जवळ नाही. मात्र काळजी घेतलीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

डॉक्टरांना सध्याच्या काळात इलाज करण्याच्या प्रक्रियेतही काही बदल करावे लागतील कारण आता डेंग्यू, चिकुनगुनिया यांचेही रुग्ण वाढतील. या रोगांमधली लक्षणंही करोनासारखीच असतात हे लक्षात घ्यावं लागणार आहे. कडक उन आणि कोरडं वातावरण यामुळे करोनाच्या संक्रमणाचा वेग मंदावतो. मात्र पावसाळ्यात जेव्हा आद्रर्ता वाढते, हवा थंड होते तसं करोना विषाणूचं संक्रमण वाढू शकतं अशीही शक्यता गुलेरिया यांनी बोलून दाखवली.