जमीन अधिग्रहण, कामगार धोरण आदी मुद्दय़ांवरून गेले वर्षभर भारतीय जनता पक्षासमवेत दोन हात करणाऱ्या भारतीय मजदूर संघ व भारतीय किसान संघ या परिवारातील संघटनांना भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेण्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. जमीन अधिग्रहण विधेयक मागे घेतल्याने किसान संघाचा सरकारविरोधी सूर मवाळ झाला आहे. तर कामगार कायद्यात अकरापैकी पाच सुधारणांचा समावेश करण्याची हमी देऊन सरकार मजदूर संघालादेखील केंद्र सरकराने शांत केले आहे. मात्र  राम मंदिराच्या मुद्दय़ावरून विश्व हिंदू परिषदेने संघाच्या बैठकीत कंठशोष करीत भाजप नेत्यांना जाब विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीत सरकारी धोरणांवर चर्चा  झाली. बुधवारपासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय बैठकीत परिवारातील संघटनांनी सरकारच्या कारकीर्दीविषयी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे मत मांडले आहे.
विहिंप नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिराचा मुद्दा समन्वय बैठकीत उपस्थित केल्याचा दावा सूत्रांनी केला. गुजरातमध्ये पटेल समाजाने पुकारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले होते. त्याचे खापर तोगडिया यांनी राज्य सरकारवर फोडले आहे. तोगडिया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अजिबात सख्य नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तोगडिया यांना राज्यात संचार करण्यास अप्रत्यक्ष बंदी घातली होती. समन्वय बैठकीत तोगडिया यांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकीकडे विश्व हिंदू परिषदेने आक्रमक होण्याचे संकेत दिले असताना किसान संघ व मजदूर संघाने मवाळ भूमिका घेतली आहे. यापूर्वी किसान संघाने सरकारच्या भू-संपादन कायद्यास तीव्र विरोध केला होता. संसदीय समितीच्या बैठकीत किसान संघाने अत्यंत स्पष्टपणे सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले होते. मात्र तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन भाजपचे केंद्रीय संघटनमंत्री रामलाल यांनी दिल्यानंतर किसान संघाचा विरोध मावळला. २ सप्टेंबर रोजी कामगार संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला भारतीय मजदूर संघाने नकारात्मक प्रतिसाद दिला. मागील आठवडय़ात किसान संघाचे ब्रिजेश उपाध्याय व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात तीनदा बैठक झाली. किसान संघाच्या अकरापैकी पाच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन जेटलींनी दिल्यावर मजदूर संघाने अन्य कामगार संघटनांसमवेत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींवर समन्वय बैठकीत चर्चा झाली.