पीटीआय, नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपने मिळविलेल्या यशाचे श्रेय पक्षाची स्थानिक सरकारे, त्यांची कार्यशैली आणि कार्यकर्त्यांची समर्पण वृत्ती या ‘त्रिवेणी संगमा’ला जाते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. निकालानंतर येथील पक्ष मुख्यालयामध्ये जल्लोष करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.
त्रिपुरा, नागालँड आणि मेघायलमधील निकालांनी लोकशाही आणि लोकशाही प्रणालीवर असलेला विश्वास जगाला दाखवून दिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ईशान्येकडील जनतेने दिलेला हा कौल म्हणजे तो प्रदेश दिल्ली आणि ‘दिल’ (हृदय) यापासून दुरावलेला नाही, हेच स्पष्ट करणारा असल्याची पुष्टीही पंतप्रधान मोदी यांनी जोडली.
तर भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना दिले. ईशान्येकडील राज्यांना मुख्य प्रवाहात आणून तेथे विकास घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या कामामुळेच निवडणुकीत यश मिळाल्याचे नड्डा म्हणाले. काँग्रेसने ईशान्य भारताचा केवळ ‘एटीएम’सारखा वापर केला मात्र मोदी यांनी तो प्रदेश भ्रष्टाचारमुक्त, शांततमय आणि विकसित केला असेही ते म्हणाले.