साम्यवादी नेत्या विद्यादेवी भंडारी यांची नेपाळच्या राष्ट्राध्यपदी बुधवारी निवड झाली. नवी घटना स्वीकारल्यानंतर नेपाळच्या संसदेने देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना निवडून दिले.

५४ वर्षीय भंडारी या सीपीएन-यूएमएलच्या उपाध्यक्षा असून, पक्षाचे दिवंगत सरचिटणीस मदन भंडारी यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांनी नेपाळी काँग्रेसचे कुल बहादुर गुरंग यांचा ३२७ विरुद्ध २१४ मतांच्या फरकाने पराभव केला. राजेशाहीचा त्याग करून २००८ मध्ये प्रजासत्ताकाची घोषणा केल्यानंतर नेपाळचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून रामबरन यादव यांची निवड झाली होती. आता विद्यादेवी त्यांची जागा घेतील. नेपाळचे सार्वभौमत्व तसेच जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवू, असे त्यांनी निवडीनंतर सांगितले.