पर्यटनाला चालना मिळावी तसेच जागतिक पातळीवर आपली प्रतिमा अगत्यशील देश म्हणून व्हावी, या हेतूने चीनने एक जानेवारीपासून ७२ तासांसाठी शांघाय ४५ देशांतील पर्यटकांसाठी पूर्णत: व्हिसामुक्त करणार आहे. चीनला खेटून असलेल्या भारत आणि पाकिस्तानातील नागरिकांना मात्र या संधीचा लाभ घेता येणार नाही.
चीनमधील सर्वात मोठे शहर असलेल्या शांघायमधील पर्यटनास त्याचबरोबर स्वस्त आणि आगळ्यावेगळ्या अशा चिनी उत्पादनांच्या विक्रीस तसेच विमान कंपन्या, पर्यटन कंपन्या, वाहतूक कंपन्या आणि पंचतारांकित हॉटेल्स यांच्याही व्यवसायात मोठी वाढ अपेक्षित आहे.
व्हिसामुक्तीची संधी लाभलेल्या या ४५ देशांमध्ये अमेरिका, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे.
प्रत्यक्षात शांघायमध्ये ३२ देशांतील नागरिकांना ४८ तासांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी आहेच. आता त्यात वाढीव २४ तासांची भर पडल्यामुळे पर्यटनपूरक उद्योगांना मोठीच चालना मिळणार आहे.