वाघा सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीत आत्मघाती हल्ला घडवणाऱया दहशवादी संघटनेने आता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे.
तुम्ही (मोदी) हजारो मुस्लिमांचे मारेकरी आहात. आम्ही काश्मीर आणि गुजरातच्या निष्पापांचा बदला घेऊ, अशा आशयाचे ट्विट वाघा सीमेवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱया ‘तहरीक ए तालिबान पाकिस्तान जमात एहरार’ या संघटनेचे प्रवक्ते एहसानुल्लाह एहसान यांनी केले आहे. त्यामुळे या दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच वाघा सीमेवरील हल्ला पाकिस्तान आणि भारत दोन्ही सरकारांना संदेश देण्यासाठी असल्याचेही एहसानने म्हटले आहे.
वाघा सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीत झालेल्या आत्मघाती हल्ल्यात तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाला तर, शेकडो जण जखमी झाले. यावरून हल्ल्याचे भीषण स्वरूप लक्षात येते. विशेष म्हणजे, बॉम्बस्फोट झालेले ठीकाण कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असूनही अशा प्रकारच्या आत्मघाती हल्ल्याला तडीस नेण्यास या दहशतवादी संघटनेला यश आले आहे. त्यामुळे या संघटनेच्या मनसुब्यांना लवकरात लवकर आळा घालणे महत्त्वाचे झाले आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद प्रभावित उत्तर मध्य भागातून काम करणाऱया अनेक दहशतवादी संघटना भारतासाठी त्रासदायक ठरत आहेत. नुकतेच पंतप्रधान मोदींनीही या संघटनांबाबत आढावा घेतला होता.