थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या १३ जणांची यशस्वी सुटका करण्यात आली. १६ दिवसांहूनही अधिक काळ या गुहेत थायलंडमधल्या ‘वाईल्ड बोअर’ फुटबॉल टीमचे १२ खेळाडू आणि त्यांचा शिकाऊ प्रशिक्षक अडकला होता. ही सर्व मुलं ११ ते १६ वयोगटातली होती. संपूर्ण जगाचं लक्ष या बचाव मोहीमेकडे लागून होतं. ही बचाव मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे. मात्र सर्व मुलं सुखरूप गुहेतून बाहेर पडल्यानंतर तासभराच्या अवधीनं महत्त्वाचा उपसा पंप बंद पडल्याची धक्कादायक माहिती या मोहिमेत सहभागी झालेल्या पाणबुड्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘दी गार्डिअन’या वृत्तपत्राला दिली आहे.

VIDEO – गुहेतून सुटकेनंतरचा त्या मुलांचा पहिला व्हिडिओ आला समोर

या मुलांना गुहेतून बाहेर काढल्यानंतर काही पाणबुडे गुहेच्या मुख्य द्वारापासून दीड किलोमीटर आत होते. बचाव मोहिमेसाठी वापरण्यात आलेल्या सामानाची बांधाबांध ते करत होते. मात्र महत्त्वाचा उपसा पंप काही तांत्रिक कारणानं बंद झाला आणि गुहेतील पाण्याची पातळी अचानाक वाढत गेली अशी माहिती तीन ऑस्ट्रेलियन पाणबुड्यांनी संबधित वृत्तपत्राला दिली. पाण्याची पातळी वाढल्यानंतर गुहेत तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे गुहेत असलेल्या १०० जणांनी गुहेच्या प्रवेशद्वारापाशी तातडीनं धाव घेतली. ही मुलं गुहेतून सुखरूप बाहेर आल्यानंतर मागे तीन नौदलाचे कमांडो आणि एक डॉक्टर असे चार जण राहिले होते. सुदैवानं हे सगळे वेळेत बाहेर पडले नाहीतर मोठा अनर्थ घडला असता असंही ते म्हणाले.

…आणि मृत्यूवर विजय मिळवला; पाहा अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ

या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. मात्र त्याचबरोबर या गुहेत साचलेलं पाणी उपसण्याचं कामही सुरू होतं. दर मिनिटांला गुहेतून हजारो लिटर पाणी उपसलं जातं होतं. सध्या या मुलांना उपचारासाठी चिअँग राय रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.