माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग प्रामाणिक व्यक्ती असून ते देशभरात नाही तर जगभरात कामातील सचोटीमुळे ओळखले जातात, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांची कोळसा घोटाळ्याप्रकरणी पाठराखण केली.
कोळासा घोटाळाप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आरोपी करून समन्स बजावल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतर नेत्यांनी गुरुवारी त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढली. दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयापासून ही पदयात्रा सुरू झाली आणि मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी ती समाप्त झाली.
मनमोहन सिंग आरोपी
मनमोहनसिंग यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. संपूर्ण पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभा आहे. ते या आरोपातून लवकरच मुक्त होतील, असे सोनिया गांधी यांनी या पदयात्रेनंतर पत्रकारांना सांगितले.
मनमोहनसिंग यांनी कधीही कोणाला झुकते माप देऊन कोणताही निर्णय घेतला नाही. त्यांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून, ते निर्दोष आहेत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी सांगितले. कायद्याचे राज्य नसलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश होऊ नये, अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.