नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची कलम ३७० रद्द झाल्यानतंर आज ३२३ दिवसांनंतर नजरकैदेतून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थितीवर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, “मला आज कळलं आपण जीवन-मरणाचे युद्ध लढतोय. यातून बचावासाठी सर्वांनी केंद्र सरकारचे आदेश पाळायलाच हवेत,” असे आवाहन त्यांनी केलं आहे.


ओमर अब्दुल्ला माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मला आज कळतंय की आपण जीवन-मरणाशी लढा देत आहोत. आमच्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना सर्वांना सध्या सोडलं आहे. त्यामुळे आता करोनाशी लढण्यासाठी सर्वांनी सरकारचे आदेश पाळायलाच हवेत.”

“ज्या पद्धतीनं जम्मू आणि काश्मीरला २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तोडण्यात आलं. त्यामुळे मुलं महिन्याभरापासून शाळेत जाऊ शकलेली नाहीत. दुकानदारांना उत्पन्न मिळेनास झालं आहे. शिकारा मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे,” अशा शब्दांत त्यांनी ५ ऑगस्टपासून आजच्या जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवरही माध्यमांशी बोलताना भाष्य केलं.

जम्मू काश्मीर सरकारने गेल्या सात महिन्यांपासून नजरकैदेत असणारे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सुटकेचा आदेश दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ओमर अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली होती. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ५ ऑगस्ट रोजी ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवलं होतं. यानंतर आता अखेर सात महिन्यांनी त्यांच्या सुटकेचा आदेश देण्यात आला आहे.