पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुर्योधनाशी तुलना करणाऱ्या प्रियांका गांधी यांच्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पलटवार केला आहे. २३ मे रोजी कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे समजणार, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते मोदीजींविषयी अपशब्दांचा वापर करत असून तुम्ही मोदीजींचा अपमान सहन करणार का, असा सवालही अमित शाह यांनी विचारला आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना दुर्योधनाशी केली होती. “देशाचे लक्ष विचलीत करण्याचे काम सध्या सुरु आहे. देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. इतिहास याची साक्ष देतो, दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता”, असे प्रियांका गांधींनी म्हटले होते. प्रियांका गांधी यांच्या या टीकेवर अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील बिशनपूर येथील सभेत प्रत्युत्तर दिले.

अमित शाह म्हणाले, प्रियांका गांधी यांनी नुकतीच मोदींवर टीका केली. त्यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली. प्रियांकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही एखाद्याचा उल्लेख दुर्योधन म्हणून केला म्हणून तो व्यक्ती खरंच दुर्योधन ठरत नाही. २३ मे कोजी कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे. राजीव गांधी यांच्या कार्यकाळातच बोफोर्स घोटाळा झाला होता आणि राजीव गांधी यांच्या काळातच श्रीलंकेत शांती सैन्यातील भारतीय जवान मारले जात होते, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.  चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी गरिबांच्या १० हजार कोटी रुपयांवर डल्ला मारला. भाजपा सरकार येताच या चिटफंड घोटाळ्यातील दोषींना तुरुंगात टाकले, असा दावा त्यांनी केला.