गुजरात दंगलीच्या कलंकाचे कारण पुढे करत सातत्याने व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे आवतण दिले आहे. अमेरिकी नागरिकांना गुजरात राज्याने केलेल्या प्रगतीची माहिती मोदींनी द्यावी, अशी विनंतीच अमेरिकेने केली आहे.
अमेरिकेच्या सिनेटचे सदस्य व विविध उद्योजकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत विचारविनिमय केला. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंग्यांनंतर मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. रिपब्लिकन काँग्रेस सदस्य अ‍ॅरॉन स्कॉक यांच्या नेतृत्वाखालील १८ सदस्यांच्या शिष्टमंडळाचे मोदी यांच्या येथील निवासस्थानी आगमन झाले. तेथे आल्यावर या शिष्टमंडळाने मोदी यांच्यासमवेत तासभर बंद दाराआड चर्चा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिष्टमंडळाचे स्वागत करताना मोदी यांनी त्यांना गुजरातमधील वाढत्या विकासाची माहिती दिली. अत्यंत कठोर मेहनत करून देशावर ठसा उमटविण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, असे मोदी यांनी या शिष्टमंडळास सांगितले. राज्यात गुंतवणूक करण्यासाठी सरकारने जे वातावरण निर्माण केले आहे, त्यामुळे अमेरिकेतील लोक प्रभावित झाले असून गुजरातसमवेत काम करण्यास ते उत्सुक आहेत, असे स्कॉक यांनी सांगितले. गुजरातमध्ये काम करण्यासाठी मुबलक संधी असल्याचेही ते म्हणाले.  गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर स्कॉक यांनी अमेरिकी संसदेत मोदी यांचे अभिनंदन केले होते. दशकापूर्वीच्या दंगलींनंतर मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. गुरुवारच्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित झाला की नाही, हे समजले नाही.