PM Narendra Modi – Xi Jinping Meeting: जवळपास ७० वर्षांपूर्वी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झोऊ एनलाय यांच्या सह्यांनी शिक्कामोर्तब केलेली ‘पंचशील तत्त्वे’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बैठकीनंतर जिनपिंग यांनी या तत्वांचा दाखला दिला आहे. तसेच, ७० वर्षांपूर्वी दोन्ही देशांनी सहकार्य व सहअस्तित्वासाठी परस्पर सहमतीने मान्य केलेल्या या तत्वांचा पुरस्कार आणि अंमबजावणी व्हायला हवी, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर ही पंचशील तत्वे नेमकी काय आहेत? यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

SCO परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनच्या तियानजिन भागात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेदरम्यान ज्या पुतिन यांच्याशी मैत्रीच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ आकारलं आहे, त्या पुतिन यांची मोदींनी गळाभेट घेतली. हे फोटोही आता व्हायरल होत आहेत. या भेटीआधी मोदींनी शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंधांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील ताणले गेलेले संबंध पूर्ववत करण्याबाबत मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. याचसंदर्भात शी जिनपिंग यांनी पंचशीलचा दाखला दिला.

काय म्हणाले शी जिनपिंग?

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात पंचशील तत्वांचा उल्लेख केला आहे. “७० वर्षांपूर्वी भारत व चीनच्या तेव्हाच्या प्रमुख नेत्यांनी ज्यांच्या अंमलबजावणीची आग्रही भूमिका मांडली, त्या पंचशील तत्त्वांचा पुरस्कार व्हायला हवा. आपण दोन्ही देशांमधील सीमाभागात शांतता व सौहार्द प्रस्थापित करायला हवं. सीमेसंदर्भातील वादांचा परिणाम एकूणात भारत-चीन सबंधांवर होता कामा नये यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत”, असं शी जिनपिंग यांनी नमूद केलं आहे.

“दोन्ही देशांनी त्यांची संयुक्त ऐतिहासिक जबाबदारी निभावली पाहिजे. वेगळ्या भूमिकांचा आदर करणे, परस्पर संवाद वाढवणे आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सहकार्य प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय न्यायभावनेचा पुरस्कार करणे, जागतिक विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न करणे, आंतरराष्ट्रीय संबंधांचं लोकशाहीकरण करणे आणि आशिया व त्यापलीकडेही शांतता व समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टी आपण करायला हव्यात”, असंही शी जिनपिंग यांनी नमूद केलं.

काय आहेत पंचशील तत्वे?

२९ एप्रिल १९५४ साली भारत व चीन या दोन देशांदरम्यान झालेल्या करारामध्ये ‘पंचशील तत्वां’ना मान्यता देण्यात आली. यात प्रामुख्याने तिबेटवरून निर्माण झालेल्या मतभेदांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व चीनचे राष्ट्राध्यक्ष झोऊ एनलाय यांच्या सह्यांनिशी या तत्वांना मान्यता देण्यात आली.

१. परस्परांची प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाचा आदर राखणे
२. एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका न घेणे
३. एकमेकांच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे
४. परस्पर समानता व हितसंबंधांचे रक्षण
५. शांततापूर्ण सहअस्तित्व

या पाच तत्वांचा पंचशीलमध्ये समावेश करण्यात आला होता.