यंदाचे शांततेचे नोबेल पारितोषिक पाकिस्तानच्या मलाला युसुफझाई हिला मिळेल अशी अपेक्षा असताना रासायनिक अस्त्रांच्या विरोधात काम करणाऱ्या व संयुक्त राष्ट्रांचे समर्थन असलेल्या ‘द ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ या संस्थेला ते जाहीर करण्यात आले आहे. या संस्थेने २००३ मध्ये बुश यांनी इराकविरूद्ध पुकारलेल्या युद्धाला विरोध केला होता तेव्हा हे पारितोषिक का मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया ट्विटरवर एका जाणकाराने व्यक्त केली आहे. अर्थातच या निवडीवर अमेरिकेचे वर्चस्व दिसत आहे.
द ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (ओपीसीडब्ल्यू) ही संस्था १९९७ मध्ये रासायनिक अस्त्रे जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेदरलँड्समधील हेग येथे स्थापन झाली. एकूण १८९ सदस्य देश असलेल्या या संस्थेचे मुख्य काम रासायनिक अस्त्रे नष्ट करणे हे आहे. नवीन रासायनिक अस्त्रे तयार केली जाऊ नयेत, सध्याची रासायनिक अस्त्रे नष्ट करण्यात यावीत, रासायनिक अस्त्रांचा धोका असलेल्या देशांना संरक्षण पुरवणे, रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध देशात सहकार्य घडवून आणणे, अशी या संस्थेची उद्दिष्टे आहेत. जे सदस्य या संस्थेचे सदस्य नाहीत त्यांनाही सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
साधारणपणे दुसऱ्या महायुद्धापासून रासायनिक अस्त्रांचा वापर मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला. त्यामुळे १९२५ च्या जीनिव्हा जाहीरनाम्यान्वये त्यांच्या वापरावर र्निबध आणण्यात आले, पण उत्पादन  व साठय़ावर असे र्निबध नव्हते. हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी रासायनिक अस्त्रांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर प्राणहानी घडवून आणली. रासायनिक अस्त्रांचा वापर काही देशांनी व अतिरेक्यांनीही वेळोवेळी केलेला आहे. रासायनिक अस्त्रांचा वापर असा वाढू लागल्यानंतर १९९७ मध्ये ‘ओपीसीडब्ल्यू’  ही संस्था स्थापन झाली. नंतर या संस्थेने अनेक ठिकाणी पाहाणी करून रासायनिक अस्त्रे नष्ट केली आहेत. अलीकडचेच उदाहरण घ्यायचे तर मध्यपूर्वेतील सीरियात यादवी युद्ध सुरू असताना तेथे रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आला व त्यात १३०० लोक मारले गेले. आता तेथे ओपीसीडब्ल्यूची दोन पथके रासायनिक अस्त्रे नष्ट करण्यासाठी काम करीत आहेत. काही देशांनी रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याची मर्यादा पाळली नाही, त्यात अमेरिका व रशिया यांनाही ते लागू आहे. जगातून सर्व प्रकारची शस्त्रे नष्ट व्हावी अशी आल्फ्रेड नोबेल यांचीही इच्छा होती. नोबेल समितीने यापूर्वी अण्वस्त्रे नष्ट करणाऱ्या अनेक संस्थांना नोबेल दिले आहे. रासायनिक अस्त्रमुक्त जगासाठी सर्वानी एकत्र येऊ या, हे या संस्थेचे ध्येयवाक्य आहे.
सीरियात रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याचे समजताच आम्ही तीन दिवसात तिथे आमच्या संस्थेचे १९ तज्ज्ञ पाठवले व सुरक्षा मंडळाने तेथील रासायनिक अस्त्रे नष्ट करण्यासाठी केलेल्या ठरावाला झटपट प्रतिसाद दिला. त्यांनी सीरियाची राजधानी दमास्कस येथे जाऊन रासायनिक शस्त्रांचे साठे नेमके कुठे आहेत याचा अंदाज घेतला व नंतर त्यातील काही नष्ट केली. आता दुसरे बारा सदस्यांचे पथक रासायनिक अस्त्रे नष्ट करण्यासाठी तेथे पाठवण्यात आले आहे.

काय आहे ओपीसीडब्ल्यू
* स्थापना-१९९७ मुख्यालय द हेग- नेदरलँडस
* सदस्य देश-१८९ महासंचालक अहमेद झुमेकू
* अर्थसंकल्प – ७५ दशलक्ष युरो
* कर्मचारी संख्या ५००
*  उद्देश- शस्त्रास्त्र नियंत्रण व नि:शस्त्रीकरण
वैशिष्टय़े :  सीरियातील रासायनिक शस्त्रांच्या वापराने विचार, आतापर्यंत २५ संस्थांना नोबेल
एकूण नामांकने – २५९ (संस्था- ५०)
* पाकिस्तानची शिक्षण हक्क
कार्यकर्ती- मलाला युसफझाई
* काँग्रेचे स्त्रीरोगतज्ज्ञ- डेनिस मुकेवेग
* विकिलिक्सची चेलसा मॅनिंग
* ल्युडमिला अ‍ॅलेक्सेवा,स्वेतलाना
गानुशिकना, लिला शिबानेवा ’क्लॉदिया पाझ’व्लादिमीर पुतिन ’एडवर्ड स्नोडेन