पीटीआय, दावोस : गव्हावरील निर्यातबंदी उठवण्याचा कोणताही निर्णय सध्या तरी केंद्र सरकार घेणार नाही, असे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी दावोस येथे सांगितले. गव्हावरील निर्यातबंदी उठवणार नसलो तरी ज्या देशांशी आधीच करार केला आहे, त्यांच्याशी निर्यात केली जाणार आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

उष्णतेच्या लाटेमुळे यंदा गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम किमतीवर झाला. गव्हाच्या देशांतर्गत किमती वाढल्याने केंद्र सरकारने १४ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. सध्या जगभरात आर्थिक अस्थिरता आहे. त्यामुळे जर गव्हावरील निर्यातबंदी उठवली तरी ते काळाबाजार आणि सट्टेबाजी करणाऱ्यांनाच मदत होईल आणि गरजू आणि गरीब देशांना खरोखर मदत होणार नाही. त्यामुळे गव्हावरील निर्यातबंदी तूर्तास उठवणार नसल्याचे गोयल म्हणाले.

गव्हाची आयात करणाऱ्या अनेक देशांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती भारताकडे केली आहे. त्यात जी ७ राष्ट्रांच्या सदस्यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे कृषी सचिव टॉम विल्सॅक यांनी याबाबत खोल चिंता व्यक्त केली आहे. गोयल यांनी सांगितले की, लवकरच जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सदस्यांची भेट घेऊन भारताने गहू निर्यातबंदीचा निर्णय का घेतला याबाबत सखोल माहिती देणार आहोत, असे गोयल यांनी सांगितले.