पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर काँग्रेसने टाळ्या वाजवल्या. पण जेव्हा नवाज शरीफ यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर ‘खेडूत महिला’ अशा शब्दांत टीका केली होती. तेव्हा आमच्यासह (भाजपा) नरेंद्र मोदी हे मनमोहनसिंग यांच्या मागे उभे होते. हाच फरक दोन पक्षात असल्याचे वक्तव्य भाजपा नेते राम माधव यांनी केले.

मागील आठवड्यात इम्रान खान यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेचा धागा पकडत राम माधव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. इम्रान खान यांनी मोदींवर टीका केल्यानंतर काँग्रेसने टाळ्या वाजवल्याचा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, आम्ही अशा विचारधारेचे लोक आहोत की, आमच्या डीएनएमध्ये अखंड भारत आहे. कोणी कितीही प्रयत्न करो, काश्मीरची एक इंच जागा आम्ही देणार नाही. यासाठी आणखी ५० वर्षे आम्ही दहशतवाद्यांशी लढण्यास तयार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मनमोहनसिंग यांच्यावर नवाज शरीफ यांनी टीका केली होती. त्यावेळी भाजपासह नरेंद्र मोदींनीं शरीफ यांचा निषेध करत मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

राम माधव यांच्याकडे जम्मू-काश्मीरची जबाबदारी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपा युतीचे सरकार स्थापन करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनीच पीडीपीचा पाठिंबा काढत असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले होते.

काय म्हणाले होते इम्रान खान..

शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांती वार्ता सुरू व्हावी यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना भारताने अहंकारी आणि नकारात्मक उत्तर दिल्यामुळे मी खूप नाराज आहे. मी माझ्या जीवनात अनेक छोट्या लोकांना भेटलो आहे, जे मोठ्या कार्यालयात मोठ्या पदावर बसले आहेत. पण त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे.