राम मंदिराचा संबंध २०१९ मधील लोकसभा निवडणुकीशी का जोडता?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला विचारला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी राम मंदिर प्रकरणाची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र सिब्बल यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यावरुनच पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.
अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. या खटल्यात कपिल सिब्बल सुन्नी वक्फ बोर्डाच्या सदस्यांची बाजू मांडत आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढील लोकसभा निवडणुकीनंतर घेतली जावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. यावरुन मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. ‘ते राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीशी का जोडतात? असा संबंध जोडणे योग्य आहे का?’ असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले. बाबरी मशिदीच्या विध्वंसाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. ते गुजरातमध्ये एका जनसभेला संबोधित करत होते.
सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू मांडली. यावेळी त्यांनी राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या खटल्यावर जुलै २०१९ नंतर सुनावणी घेतली जावी, अशी विनंती केली. लोकसभा निवडणुकीआधी या खटल्याचा निकाल आल्यास त्याचे अतिशय मोठे राजकीय परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. ८ फेब्रुवारी २०१८ रोजीच या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले.
विशेष म्हणजे सुन्नी वक्फ बोर्डाने कपिल सिब्बल यांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे म्हटले. राम मंदिराप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढला जावा, अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बोर्डाच्या याच भूमिकेचा संदर्भ देत, ‘सर्वांना या प्रकरणात लवकरात लवकर निकाल लागवा, असे वाटते. मात्र याला फक्त काँग्रेसचे नेते अपवाद आहेत,’ असे मोदींनी जनसभेला संबोधित करताना म्हटले.