नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) प्रमुख फारुख अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची रात्री भेट घेतात, असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले, “मला पंतप्रधान मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायचे असेल तर मी त्यांना दिवसा भेटेन, मी त्यांना रात्री का भेटू? ते सतत प्रत्येक मार्गावर माझी बदनामी करत आहेत”
“जेव्हा गुलाम नबी आझादांना राज्यसभेची जागा देत नव्हती, तेव्हा मीच त्यांना राज्यसभेची जागा द्यावी अशी मागणी केली होती. पण आज ते हे सर्व सांगत आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बसलेल्या त्यांच्या एजंटची नावे अमित शाह आणि मोदींना सांगावीत, जेणेकरून त्यांना सत्य समजेल”, ते पुढे म्हणाले.
हेही वाचा >> ‘राष्ट्रवादी’प्रकरणी निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस, तर शरद पवार गटाला दिलासा
नॅशनल कॉन्फरन्सचे नेतृत्व करणारे फारूख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा ओमर यांनी २०१४ मध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्न केले होते, असा दावा आझाद यांनी केला. पिता-पुत्र या दोघांवर “डबल गेम” असल्याचा आरोप करत त्यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या काही गोष्टींचा हवाला दिला होता. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भविष्यात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत दिले, परंतु हे संकेत ओमर अब्दुल्ला यांनी नाकारले.
फारुख अब्दुल्ला विरोधक आणि सरकारांना खूश करण्याचा प्रयत्न करतात
“फारुख आणि उमर सरकार आणि विरोधी पक्षांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असाही दावा आझाद यांनी केला होता. आझाद यांनी कलम ३७० रद्द करण्यापूर्वी ३ ऑगस्ट २०१९ रोजी अब्दुल्ला आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कथित भेट घडवून आणली.
ओमर अब्दुल्ला यांनीही गुलाम नबी आझाद यांच्यावरही ताशेरे ओढले, “वाह भाई वाह गुलाम नबी आझाद, आज इतकं पित्त उसळलं. २०१५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभेच्या जागांसाठी आमच्याकडे भीक मागणारा गुलाम कुठे आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
“ज्या पद्म पुरस्कारासाठी तुम्ही काँग्रेस सोडून चिनाब खोऱ्यात भाजपला मदत करण्याचे मान्य केले ते विसरू नका. कोण आझाद आणि कोण गुलाम, काळच ठरवेल आणि जनता ठरवेल,” असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले होते.