२२ जानेवारीचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जसा जवळ येतो आहे तसं देशातलं वातावरण चांगलंच तापताना दिसतं आहे. एकीकडे शंकराचार्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. प्राणप्रतिष्ठा धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केली जात नसल्यने आम्ही तिथे उपस्थित राहणार नाही असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आरोपांच्या फैरी काँग्रेसकडून झाडल्या जात आहेत. अशात आता शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेची उपासमार घालवण्यासाठी १० दिवस उपास करावा असा टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?
धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अयोध्येतील मंदिर, श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. अयोध्येतील मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. राम मंदिराचे काम बाजूला राहिले मात्र आता भाजपा आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
हे पण वाचा- “पंतप्रधान मोदींनी मनमानी करु नये, प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढे ढकलावा..” ; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं आवाहन
मोदींना खोचक सल्ला
राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? असा सवाल शरद पवारांनी भाजपला केला आहे. मोदी राम मंदिरासाठी १० दिवस उपवास करत आहेत तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा, असा खोचक सल्ला देखील शरद पवारांनी मोदींना दिला आहे.
सध्याच्या स्थितीत देशातल्या उद्योगपतींची कर्जे माफ केली जातात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही ही खंतही शरद पवार यांनी बोलून दाखवली. देशात चुकीची आर्थिक धोरणं राबवली जात असल्याचीही टीका शरद पवार यांनी केली.
