Nikhil Kamath to Sam Altman: झेरोधाचे सहसंस्थापक यांनी नुकतेच ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांची डब्लूटीएफ पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलते जग आणि समाज, लग्न आणि मुले यासांरख्या विविध विषयांवर चर्चा केली. सॅम ऑल्टमन यांनी चॅटजीपीटीसारखे तंत्रज्ञान जगाला देऊन कृत्रिम बुद्धिमत्तेला एका उंचीवर नेले आहे. निखिल कामथ यांनी घेतलेल्या मुलाखतीत तंत्रज्ञान, त्याची उत्क्रांती याबाबत महत्त्वाचा आशय आहेच. त्याशिवाय ऑल्टमन यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचे कुटुंबाबद्दलचे विचार, यावरही कामथ यांनी प्रश्न विचारले आहेत.
समलैंगिक लग्न करणाऱ्या सॅम ऑल्टमन यांना मुलांबाबत प्रश्न
विशेष म्हणजे निखिल कामथ यांनीच मागे मुलं नको, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांनी समलैंगिक विवाह करणाऱ्या सॅम ऑल्टमन यांना विचारलेल्या प्रश्नाची चर्चा होत आहे. निखिल कामथ यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ऑल्टमन म्हणाले, कुटुंब असणे ही आनंद देणारी गोष्ट आहे. भावनिकदृष्ट्या तुमच्यासाठी कुटुंबसंस्था ही खूप महत्त्वाची असते. यानंतर कामथ यांनी काही वर्षांपूर्वी वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या मुलाशी झालेल्या भेटीची आठवण काढली.
मुलं असण्याचे महत्त्व काय आहे, हे सांगताना ऑल्टमन म्हणाले, आयुष्यात मुलांकडून मिळणारे प्रेम तुम्ही इतर ठिकाणी अनुभवू शकत नाहीत. अतिशय नितळ आणि खरे प्रेम तुम्हाला त्यांच्याकडून मिळते. यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही. आयुष्यात मुले असावीत, एवढेच मी म्हणेण. मला वाटते की, मुले असणे एक अद्भूत आणि आश्चर्यकारक बाब आहे.
लोकांना मुले का हवी असतात?
या पॉडकास्टमध्ये निखिल कामथ यांनी पुढे विचारले की, लोकांना मुले का हवी असतात? या प्रश्नावर सॅम ऑल्टमन म्हणाले की, कुटुंब ही आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मीदेखील आधी कुटुंबाला कमी लेखले होते. ते प्रत्यक्षात कसे असेल, याची कल्पना नव्हती. परंतु आता कळतेय की, कुटुंब अतिशय महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण असे आहे.
मुले असणे ही केवळ प्रजननाची जैविक गरज आहे का? असा प्रश्नही कामथ यांनी यावेळी विचारला. त्यावर ऑल्टमन म्हणाले की, त्यांना याची पर्वा नाही. ही गोष्ट इतकी खोलवर रुजलेली आहे की, ती शब्दात मांडणे कठीण आहे. माझ्या ओळखीत असे काही लोक आहेत, ज्यांचे करिअर झाले आहे. त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते कुटुंबाबद्दल ऋण व्यक्त करतात. त्यांच्याकडे असलेल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी कुटुंब ही गोष्ट आहे, असे ते सांगतात.
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि त्यांचा जोडीदार ऑलिव्हर मुल्हेरिन यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांना बाळ झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले होते.
AI च्या जगात कुटुंब व्यवस्था अधिक महत्त्वाची – ऑल्टमन
ऑल्टमन पुढे म्हणाले की, आगामी काळात जेव्हा जग आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (AGI) चे असेल. तेव्हा कुटुंब आणि समाज यांची गरज अधिक ठळक होईल. ऑल्टमन म्हणाले, “मला वाटते की, कुटुंब आणि समाज या दोन गोष्टी आपल्याला सर्वाधिक आनंद देतात. मला आशा आहे की, आपण परत त्याकडे वळू.”
निखिल कामथ मुलांबद्दल काय म्हणाले होते?
२०२४ मध्ये एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना निखिल कामथ यांनी त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी मुलांची गरज नाही, असे म्हटले होते. एखाद्या व्यक्तीने दोन दशके मुलांना वाढविण्यात घालवावी, ही कल्पनाच कामथ यांना मान्य नव्हती, असे ते म्हणाले.