उपासमारीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडली आहे. मृत पावलेल्या महिलेच्या पतीला शिधावाटप दुकानदाराने धान्य देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. पत्नी आजारी असल्याचे सांगूनही दुकानदाराने बायोमॅट्रिक माहिती देण्याची मागणी केली आणि धान्य देण्यास नकार दिला. यामुळेच आपल्या पत्नीची उपासमार झाली आणि तिचा मृत्यू झाला, असा आरोप पतीने केला आहे.
बरेलीमध्ये राहणाऱ्या इशाक अहमद यांच्या पत्नीची प्रकृती गेल्या पाच दिवसांपासून ठीक नव्हती. भोलेनगरमध्ये एका झोपडीत राहणारे ५० वर्षांचे इशाकही बहुतेकदा आजारी असतात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पत्नी सकिना आजारी असल्याने इशाक शिधावाटप दुकानात धान्य आणण्यासाठी गेले होते. मात्र, दुकानदाराने त्यांच्या बायोमॅट्रिक माहिती देण्याची मागणी केली. पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ती बायोमॅट्रिक माहिती देण्यासाठी येऊ शकत नाही, अशी व्यथा इशाक यांनी मांडली. पत्नी उपाशी असल्याने त्यांनी दुकानदाराकडे गयावयादेखील केली. मात्र, तरीही दुकानदाराने धान्य देण्यास नकार दिला.
या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी राघवेंद्र विक्रम सिंह यांनी अहवाल मागवला आहे. इशाक अहमद यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. वारंवार येणाऱ्या आजारपणामुळे त्यांच्याकडे धान्य खरेदीसाठी पैसे नव्हते. त्यातच आजारी पत्नीला खाण्यासाठी काहीच नसल्याने इशाक मोठ्या आशेने शिधावाटप दुकानात आले होते. मात्र, बायोमेट्रिक माहितीसाठी पत्नीला घेऊन ये, असे दुकानदाराने त्यांना सांगितले. मात्र, आजारी पत्नीला दुकानात आणणे शक्य नसल्याने इशाक हतबल झाले. त्यामुळे त्यांना धान्य मिळू शकले नाही.