मागच्या ३५ दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या कुस्तीगीरांनी आता आपल्या पाच मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. अखिल भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येतं आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन कुस्तीगीरांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर कुस्तीगीरांनी आपल्या पाच मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. या बैठकीशी संबंधित ठळक घडामोडी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. अनुराग ठाकूर यांनी उशिरा ट्वीट करत कुस्तीगीरांना चर्चेसाठी या म्हणून बोलावलं होतं. त्यानंतर हे दोन कुस्तीगीर चर्चेसाठी गेले होते. पाच दिवसातली सरकारबरोबर ही कुस्तीगीरांची दुसरी बैठक होती. सात महिला कुस्तीगीरांतर्फे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्यानंतर हे आंदोलन सुरु झालं आहे. शनिवारी हे कुस्तीगीर गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. आता बुधवारी अनुराग ठाकूर यांच्यासह त्यांची चर्चा झाली. प्रामुख्याने पाच मागण्या या कुस्तीगीरांनी ठेवल्या आहेत. त्यातली मुख्य मागणी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी महिलेला नेमण्यात यावं ही आहे. तसंच या पदासाठी बृजभूषण शरण सिंह यांच्या कुटुंबातील कुणाचाही विचार केला जाऊ नये असंही या कुस्तीगीरांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी नव्या संसदेचं उद्घाटन झालं त्यादिवशी कुस्तीगीरांनी आंदोलन केलं होतं. मात्र या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशीही एक मागणी कुस्तीगीरांनी केली आहे. तसंच बृजभूषण शरण सिंह यांनी अटक झाली पाहिजे या आपल्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. कुस्तीगीरांच्या या आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा विनेश फोगाटही आहे. मात्र आज झालेल्या बैठकीत विनेश आली नव्हती. हरियाणा तल्या बालली गावात पंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी तिला जायचं होतं. तिचं हे जाणं आधीच ठरलं होतं त्यामुळे अनुराग ठाकूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीला ती पोहचली नव्हती. अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी रात्री १२.४७ ला एक ट्वीट केलं होतं आणि सरकार कुस्तीगीरांशी चर्चा करायला तयार आहे असं म्हटलं होतं. मी पुन्हा एकदा कुस्तीगीरांना चर्चेसाठी बोलवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं ज्यानंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे दोघे त्यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी गेले होते. कुस्तीगीरांनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात २३ एप्रिलपासून जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन सुरु केलं होतं. अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण सिंह यांनी केलं आहे आणि त्यांना तातडीने अटक करावी ही त्यांची प्रमुख मागणी होती. २८ मे रोजी जंतरमंतर या ठिकाणाहून कुस्तीगीरांना हटवण्यात आलं. त्यांनी संसदेच्या दिशेने मार्च सुरु केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सरकार कुस्तीगीरांच्या बहुतांश मागण्या मान्य करायला तयार आहे. मात्र बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर सरकार आणि कुस्तीगीर यांच्यात मतभेद आहेत. कारण बृजभूषण हे भाजपा खासदार आहेत. कुस्तीगीर मागील आठवड्यापासून आपल्या सरकारी नोकरीवर रुजू झाले आहेत. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे दोघंही रेल्वे कर्मचारी आहेत.