Sakshi Malik Posts Video on Twitter : कुस्तीगीरांचं आंदोलन सुरुच राहणार आहे असा पुनरुच्चार ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने केला आहे. भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे. त्यांना अटक करण्यात यावी यासाठी हे आंदोलन सुरु केलं होतं. २८ मे रोजी दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. यानंतर कुस्तीगीरांना ताब्यातही घेण्यात आलं. त्यांच्याविरोधात FIR दाखल करुन त्यांना सोडण्यात आलं. आता साक्षी मलिकने एक व्हिडीओ पोस्ट करत आंदोलन संपलं नाही असं म्हटलं आहे एक आवाहनही केलं आहे.
काय म्हटलं आहे साक्षी मलिकने?
आम्ही शांततापूर्वक आंदोलन करत होतो. पण पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं. त्यानंतर आमच्या विरोधात FIR केला. आम्ही कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं नाही तरीही गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेला २०-२० जणांनी धरुन ठेवलं होतं. त्यावरुनच तुम्हाला अंदाज येईल की आमच्याशी नेमकं कसं वर्तन पोलिसांनी केलं असेल. मी आज व्हिडीओतून सांगते आहे की जे आमचे समर्थक त्यांना सांगू इच्छिते की सोमवारी आम्ही आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? याची रुपरेषा ठरवली. मात्र आम्ही मागे हटलेलो नाही. आंदोलन सुरुच राहणार आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. असं साक्षी मलिकने म्हटलं आहे.




२८ मे रोजी एकीकडे नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं तर दुसरीकडे विनेश फोगाट, बजरंग पुनिया, संगिता फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह अनेकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आंदोलकांचं जंतरमंतरवरचं सामानही हटवण्यात आलं होतं. कुस्तीपटून रविवारी ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी सोडण्यात आलं आहे. या कुस्तीपटूंना जंतरमंतर वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन करता येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
कुस्तीपटू गेल्या ३४ दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.