उत्तर प्रदेशात जर भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाने ३१२ जागा जिंकून आपले सरकार स्थापन केले त्यावेळी देखील भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे म्हटले होते. भारतीय जनता पक्षाने बहुमताने सरकार स्थापन केले परंतु अद्यापही कर्जमाफीवर काहीच चर्चा झाली नाही.

याऐवजी अॅंटी रोमियो स्क्वॅड आणि कत्तलखाना बंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यावर कारवाई देखील करण्यात आली परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तसाच राहिला. असे पाहून एका शेतकऱ्याने योगी आदित्यनाथ यांच्या मठासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आदित्यनाथ यांच्या गोरक्षनाथ मठासमोर शेतकऱ्याने आपल्या अंगावर पेट्रोल टाकले आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याच्या जवळ असलेल्या लोकांनी आग विझवली. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या तो पोलीस स्टेशनमध्ये आहे अशी माहिती उपलब्ध आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.

आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच आपल्या लोकसभा मतदारसंघाला भेट दिली. दोन दिवस ते विविध ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. काल झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला. कुठल्याही व्यक्तीला धर्माच्या, पंथाच्या, लिंगाच्या आधारावर भेदभावाची वागणूक दिली जाणार नाही असे आदित्यनाथ यांनी म्हटले. तसेच त्यांनी काल हज यात्रेला ज्या प्रमाणे अनुदान असते त्या प्रमाणे कैलास मानसरोवर यात्रेसाठी १ लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. जे लोक यात्रा करण्यासाठी शारिरिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना कैलास मानसरोवर यात्रेसाठी अनुदान दिले जाईल अशी घोषणा काल आदित्यनाथांनी केली.

त्याच बरोबर गाजियाबाद, नोएडा किंवा लखनौ या तिन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणी मानसरोवर भवन बांधले जाईल असे ते म्हणाले. आदित्यनाथ यांनी सुरू केलेला अॅंटी रोमियो स्क्वॅड सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही ठिकाणी मित्र मैत्रिणी किंवा पती-पत्नीलाही पोलिसांनी त्रास दिल्याचे समोर आले आहे. आपल्या वर्तनाने सामान्य नागरिकांना त्रास होईल असे वागू नका असे आदेश आदित्यनाथांनी पोलिसांना दिले आहेत.