पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाचे ढोंग करणाऱ्या संघटनांचे कान उपटल्यानंतर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, गंभीर असा इशारा विहिंपने दिला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांकडून दलितांवर होत असलेल्या हिंसाचाराविरुद्ध मतप्रदर्शन करताना तथाकथित गोरक्षकांची खरडपट्टी काढली होती. नरेंद्र मोदींचे हे वक्तव्य धक्कादायक आणि गोरक्षकांचा अपमान करणार असल्याची प्रतिक्रिया विहिंपकडून एका निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. विहिंपकडून एका अनऔपचारिक निवेदनाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. हजारो खाटिकांकडून दरवर्षी लाखभर गायी मारल्या जात असताना गोरक्षकांना गुंड बोलणे योग्य नाही. गोरक्षकांना गुंड बोलणे हा तुमच्या भूमिकेत झालेला बदल दाखवून देणारा असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. बजरंग दलाकडून विहिंपच्या सुरात सूर मिसळणारी भूमिका घेण्यात आली आहे. मोदींच्या विधानामुळे गोरक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागेल, असे बजरंग दलाचे आग्रा शहरातील उपाध्यक्ष सुनिल पराशर यांनी सांगितले. विहिंप ही गायींच्या रक्षणासाठी झटणारी एकमेव संघटना आहे. त्यामुळे गोरक्षणाच्या नावाखाली कोण गोमांसाचा व्यापार करत आहे, याचा छडा सरकारने लवकरात लवकर लावावा, असेही पराशर यांनी म्हटले आहे.
ढोंगी गोरक्षकांचा प्रचंड संताप येतो: पंतप्रधान मोदी
तथाकथित गोरक्षकांपैकी बहुतांश लोक ‘समाजकंटक’ असून ते गोरक्षणाच्या नावावर दुकानदारी चालवत आहेत, अशा शब्दांत मोदींनी गोरक्षकांची कानउघाडणी केली होती. गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश यासह देशात निरनिराळ्या राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी गाईंचे संरक्षण करण्याच्या नावावर दलित व मुस्लिमांना मारहाण केल्याच्या मुद्दा देशभरात गाजत आहे.
हवे तर मला गोळया घाला, पण दलितांवरील हल्ले थांबवा: पंतप्रधान मोदी